सांगली जिल्ह्यातील नागपंचमी सणासाठी प्रसिद्ध असलेल्या डोंगरी ३२ शिराळा तालुक्याच्या पश्चिमेला डोंगराच्या कुशीत वसलेले आणि निसर्गरम्य परिसर लाभलेले सोनवडे गाव..! शिराळा चांदोली मुख्य रस्त्यालगतच असलेले २०११ च्या जनगणनेनुसार २०९२ लोकसंख्येचे हे गाव. तालुक्याच्या मुख्य ठिकाणापासून अवघ्या ३७ किलोमीटर अंतरावर आहे. या गावाजवळून शिराळा,वाळवा,शाहूवाडी व कराड तालुक्यासाठी वरदायी ठरलेले, पर्यटकांचे आकर्षण असणारे वारणा धरण अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर. गावाच्या उत्तरेला उंच व जणू हिरवा शालू पांघरलेले हिरवेगार डोंगर तर दक्षिणेला सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी वारणा नदी.जिचा उगम सह्याद्री पर्वतातील पाथरपुंज पठारावर झाला आहे.
सोनवडे गावात विविध धार्मिक स्थळे आहेत जी स्थानिक लोकांसाठी श्रद्धेचे केंद्र आहेत. येथे ज्योतिर्लिंग मंदिर, विठ्ठल-रखुमाई मंदिर आणि गणपती मंदिर प्रमुख असून, येथील लोक विविध सण आणि उत्सव आनंदाने साजरे करतात.
गावात स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्ञान मंदिर असून या ज्ञानमंदिरातून शिक्षण घेऊन गेलेले मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे असे अभिमानाने सांगतात. १९२६ साली शाळेची स्थापना झाली असून शाळेच्या रेकॉर्डवरील पहिला दाखल विद्यार्थी म्हणून बळी कृष्णा नांगरे यांचे नाव असून याच गावातील मारुती पांडू पाटील, पिली बाप रामचंद्र मुळे,भाऊ हरी काळूखे,पांडुरंग केसू नायकवडी, ज्ञानू रामा कुंभार, मारुती बीन विठू खंडागळा, शिदु बाळा चांभार, तात्या ज्ञानू न्हावी, रामा तुका पाटील या नावाच्या जुन्या नोंदी पहावयास मिळतात.आजही या गावात इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग असून गुणवंत व प्रज्ञावंत विद्यार्थी घडवण्यासाठी शाळा प्रयत्नशील असते.
लहान मुलांसाठी अंगणवाडी असून सोनवडे ग्रामपंचायत अंतर्गत काळोखेवाडी,खोतवाडी,जळकेवाडी येथे अंगणवाड्या व प्राथमिक शाळा आहेत.
म्हणून किसन अहिर,रामचंद्र अहिर, शामराव पाटील व चरणचे ज्ञानू नायकवडी यांच्यावर जागा निवडण्याची जबाबदारी सोपवली. जागेची निवड होताच दुसऱ्या दिवशी जागा बदलायची असे ठरले. तो दिवस होता २३ फेब्रुवारी १९४६. मणदूरचा परिसर पायाखाली घालून जागा निवडून परत येत असताना त्यांना नुकतेच येरवड्याचा जेल फोडून पळून आलेले येडेनिपाणीचे पांडू मास्तर भेटले. पांडू मास्तरांनी किसन अहिर व त्यांच्यासोबत असणाऱ्या क्रांतिकारकांना मणदूर येथे राहण्याचा आग्रह केला.पांडू मास्तरांच्या मागावर इंग्रज पोलीस होते.पांडू मास्तर, वाळव्याचे किसन अहिर व त्यांचे सहकारी ज्या घरात झोपलेले होते,त्या घरावर पोलीसांनी छापा टाकला. पोलिसांच्या बुटाच्या आवाजाची चाहूल लागताच हत्तीचे बळ असणारे किसन अहिर पांडू मास्तरांना खांद्यावर घेऊन पाठीमागच्या दरवाज्यातून पळून गेले. इकडे अण्णांना पोलीस पार्टी मणदूरला गेल्याचे कळाले. किसन अहिर परत न आल्यामुळे मनामध्ये शंका आली. सबंध कॅम्पवर चिंतेचे वातावरण पसरले. दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजेपर्यंत येणारे किसन पैलवान परत न आल्यामुळे थावड्यामधील किर्र जंगलातून आणखी तीन क्रांतिकारकांना शोधार्थ पाठवले.
तेही मध्यरात्रीपर्यंत परत आले नाहीत. त्यामुळे काहीतरी दगा फटका झाला आहे असे समजून पहाटेच्या वेळी लष्करी गणवेशातील सुमारे ८० तरुण खांद्यावर बंदूका घेऊन मणदूरच्या दिशेने निघाले.दिवस उगवण्याच्या सुमारास आरळा येथे पोहोचले. मणदूर गावाला पोलिसांनी वेढा दिल्याचे क्रांतिकारकांना समजले. मणदूर – सोनवडे सीमेवरती असणाऱ्या ओढ्याजवळ क्रांतिकारकांनी थांबण्याचा निर्णय घेतला व पोलीस येताच क्षणाचाही विलंब न करता हल्ला करायचे ठरले. किसन अहिर व त्यांचे सहकारी मात्र थावड्याकडे पोहोचले. तिथे त्यांना आपल्या शोधासाठीच सर्व फौज मणदूरकडे गेली असल्याचे समजताच ते परत सोनवडेच्या सीमेवरील ओढ्यावर आले. किसन अहिर यांना पाहताच अण्णांना खूप आनंद झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन ग्रुप दबा धरून बसायचे ठरले.एका ग्रुपचे नेतृत्व क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी व मनसासिंग यांनी तर दुसऱ्या ग्रुपचे नेतृत्व किसन अहिर व नानकसिंग यांनी करण्याचे ठरले.
भूमिगत क्रांतिकारक आपल्या जाण्याच्या मार्गावर बसल्याचे पोलिसांना कळताच त्यांनी आपल्या गाड्या मणदूरातच सोडून मुख्य रस्त्यावरून न येता उत्तरेच्या बाजूला किसन आहिर व नानकसिंग यांचा गट असणाऱ्या बाजूने लपून छपून जाण्याचे ठरवले. अगोदर पोलिसांनी शरण आल्याचा बहाणा केला व अचानक फायरिंग करायला सुरुवात केली.आपले क्रांतिकारक ही पोलिसांवर तुटून पडले. सर्व आसमंत बंदुकीच्या आवाजाने दुमदुमून गेला. तुफान फायरिंग झाली.बाकीच्यांना वाचवण्यासाठी किसन अहिर व नानकसिंग पोलिसांच्या फळीत उतरले व करवंदीच्या जाळी मागे उभे राहून पोलिसांवर गोळीबार केला.तुफान सेनेच्या हल्ल्यापुढे पोलिसांना माघार घ्यावी लागली.पोलिसांनी माघार घेताच सर्व क्रांतिकारक आनंदाने नाचू लागले. सर्वजण एकत्र येतात एवढ्यात नागनाथ अण्णांना आपले वाघ शहीद होऊन पडल्याचे दिसले. हुतात्मा किसन अहिरांना छातीशी कवटाळून अण्णा रडू लागले. हुतात्मे झालेले किसन अहिर व नानकसिंग यांची प्रेते पोलिसांच्या हाती लागून विटंबना होऊ नये म्हणून क्रांतिवीर नागनाथ अण्णा सहकाऱ्यांना घेऊन वारणा नदी पार करून गळ्याइतक्या पाण्यातून प्रेते हातावर अलगद धरून शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर पैकी पाटीलवाडी या डोंगराच्या कुशीत अत्यंत गर्द झाडीत असलेल्या ठिकाणी दहन देतात व प्रेतात्म्यांची मातीही पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून दहन केलेल्या ठिकाणची राख धुवून घालवतात.ही घटना २५ फेब्रुवारी १९४६रोजी घडली. बाकीच्या क्रांतिकारकांचे जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या किसन अहिर व नानकसिंग यांना अण्णा विसरले नाहीत. त्यांनी समाज परिवर्तनाचे जिवंत स्मारक सोनवडे येथे हुतात्मा नानकसिंग विद्यालय या नावाने उभे केले आहे.या हुतात्मा नानकसिंग विद्यालयांमध्ये आजही डोंगर कपाऱ्यातील व परिसरातील सर्वच गोरगरिब,शेतकरी, कष्टकरी व मजुरांची मुले शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहोचण्यासाठी धडपड करत आहेत.
गावात प्राथमिक आरोग्य केंद्र मणदुर अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर सोनवडेअसून या उपकेंद्रामध्ये साथ रोग प्रतिबंधक उपाय योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना सुरक्षा योजना, जननी सुरक्षा योजना, माता व बालसंगोपन आदी योजनांचा लाभ गावातील जनतेला मिळतो तसेच महिन्यातील एक दिवस ग्राम आरोग्य पोषण दिन म्हणून शून्य ते सोळा वयोगटातील मुलांना लसीकरण केले जाते त्यामुळे मुलांमध्ये विविध आजारासाठी रोगप्रतिकारक शक्ती तयार होते.
गावातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती व पशुपालन हा आहे.डोंगराकडे जिरायती पिके तर नदीकाठी बागायती पिके घेतली जातात. कोणती व्यक्ती कोणत्या शेतात आहे हे समजण्यासाठी शेतांची शिव, तळ्याची पट्टी,अक्कलशेत, खैराट, कोंडार, खोडवळ, तोरण पट्टी,नाळवा,घोडवगाळ, देव मळा, सासनपट्टी, परीटकी कुंभारकी, गुरवाळ, न्हावकी, सुतारकी, लिकचा मळा अशी नावे आहेत. पूर्वीच्या काळी भात, भुईमूग,मका,खपली, हरभरा, पावटा,तूर,उडीद इत्यादी पिके घेतली जायची मात्र आता ऊस व भात पिके घेतली जातात. गव्यासाठी प्रसिद्ध असलेले चांदोली अभयारण्य जवळ असल्याने अभयारण्यातील प्राणी पिकांचे नुकसान करतात त्याचबरोबर नदीकाठी असणाऱ्या शेतीचे महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होते. असं असलं तरी गड्या आपला गाव बरा असे लोक आनंदाने म्हणतात.